‘मविआने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून केलेला अक्षम्य हलगर्जीपणा लवकरच जनतेसमोर येणार’

नागपूर – राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यातच आता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले आहे.

ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय तातडीने मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आज दिल्ली येथे सॉलिसिटर जनरल तुषार जी मेहता यांना जाऊन भेटले. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून केलेला अक्षम्य हलगर्जीपणा लवकरच जनतेसमोर येईल.

शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांना या विषयाचे गांभीर्य ठाऊक असल्याने त्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला नाही आणि ते स्वतः गेले. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील अशीच तत्परता दाखविता आली असती. परंतु ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचेच नसल्याने त्यांनी केवळ टाईमपास केला.असा देखील आरोप त्यांनी केला.