बंजारा सेना कार्याध्यक्षांचा भाजपात प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

कोराडी : अखिल भारतीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चेतन चव्हाण (Chetan Chavan) यांच्यासह मोठ्या संख्येत बंजारा सेनेच्या कार्यकर्त्यांना रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या (Chandrashekhar Bawankule) हस्ते भाजपात (BJP) प्रवेश केला. बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते प्रयत्न करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष  बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेशासाठी मोठ्या संख्येने बंजारा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक धोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी चेतन चव्हाण म्हणाले, राष्ट्रनेते पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (PM Narendra Modi And Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन आम्ही भाजपा पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बंजारा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे दुपट्टा घालून स्वागत केले. ते म्हणाले, राष्ट्रप्रथम व अंत्योदयाच्या संकल्पनेला प्रतिसाद देत बंजारा सेनेतून भाजपात प्रवेश करणारे कार्यकर्ते समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रतिबद्ध झाले आहेत. सेवा पंधरवडा सुरू असून जनसेवेच्या कार्यात समाविष्ठ होण्यासाठी हे कार्यकर्ते सरसावले आहेत असाही उल्लेख त्यांनी केला.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश

प्रदेशाध्यक्षांच्या बारामती दौऱ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडू लागले असून त्याची सुरुवात झाली आहे. नागपूर ग्रामीणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी पंकज यादव यांच्यासह मोठ्या संख्येत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी   बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले व पक्षात काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.