“मी खंबीररित्या जगू शकत नाही…”, ‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत मांडली व्यथा

‘पुष्पा’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अनुसया भारद्वाज (Anasuya Bharadwaj) एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. यात ती ढसाढसा रडताना दिसत आहे. पण अनुसयाच्या रडण्यामागचे कारण आहे?

अनसूयाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओला कॅप्शन देताना तिने तिच्या रडण्याचे कारणही सांगितले आहे.

अनसूयाची संपूर्ण पोस्ट

“नमस्कार!! तुम्ही सर्वजण बरे असाल, अशी मी आशा बाळगते. मला माहिती आहे की जे कोणी माझी ही पोस्ट पाहत असतील, ते गोंधळात पडले असतील. माझ्या माहितीप्रमाणे सोशल मीडियाद्वारे आपण जगभरातल्या लोकांबरोबर संवाद साधू शकतो. याचा वापर करुन आपण एकमेकांना आधारही देऊ शकतो. चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. एकमेकांची जीवनशैली, संस्कृतीही यातून समजू शकतो. तसेच आनंद आणि दु:खही वाटून घेता येते.

याच सोशल मीडियाचा वापर करुन मी माझ्या वाईट क्षणांबद्दल चाहत्यांना सांगू इच्छिते. मी ज्याप्रकारे माझे फोटोशूट, आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करते, त्याचप्रकारे मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी फोटोसाठी देणाऱ्या पोझ, फोटोशूट, डान्स, हसणं आणि तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्याचा एक भाग आहात. त्यातून तुम्हा सर्वांना माझ्या भावना कळतात. हे माझ्या आयुष्याचे काही टप्पे आहेत ज्या ठिकाणी मी खंबीररित्या जीवन जगू शकत नाही. मी कमजोर व्यक्ती आहे.

पण मी एक सेलिब्रेटी असल्याने मला माझ्या भावनांबद्दल तटस्थपणे विचार करावा लागतो. मी कितीही खंबीर असल्याचे दाखवत असली तरी मी तशी नाही. जेव्हा माझ्यातील सहनशील वृत्ती संपते तेव्हा मी स्वत:ला वेळ देते. मी खूप रडते. त्यानंतर एक-दोन दिवसांनी पुन्हा त्याच जोमाने उभी राहते. #ItsOKtoBeNotOK हे देखील महत्त्वाचे आहे. विश्रांती घ्या. स्वत:ला पुन्हा एकदा रिबूट करा. पण धीर सोडू नका.

त्याबरोबरच मला तुम्हाला सांगायचं की इतरांनाही समजून घ्या. जर तुम्हाला कोणी काही सांगितले तर कदाचित त्याचे दिवस वाईट जात असतील. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुद्धा हे शिकण्याचा प्रयत्न करत आहे”, असे अनसूयाने म्हटले आहे.