‘मी सरकारमध्ये आहे म्हणून माझी भूमिका बदलणार…’, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण

ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या ‘समाज दिन’ कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. हा माणुस उठूनसुठून कुणावरही टीका करत असतो. त्यामुळं इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल.” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंवर टीकास्त्र सोडलंय.

मात्र या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांच्यावर अनेक नेत्यांनी जातीयवादी टीका केल्याचा आरोप करत धारेवर धरले आहे. यावर स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, सरकारमध्ये आहे म्हणुन मी माझी भूमिका बदलणार नाही. माझी जी भूमिका आहे तिच्यावर मी ठाम आहे ती बदलणार नाही. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतु नाही. मी सरकारमध्ये असलो, नसलो तर माझी भूमिका शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे असणार आहे.

‘कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. महात्मा फुले यांना भिडेंनी आपला वाडा दिला म्हणून तिथे शाळा सुरू झाली. ब्राम्हण आहेत म्हणून विरोध नाही. पुर्वी ब्राम्हणांच्या मुलींनाही शिक्षण नव्हतं. ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासीक पुरावा आहेत त्याच्यावर चर्चा करता येईल’, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

तर ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही ते स्पष्ट करावं, त्यांना संभाजी भिडे हे नाव का घ्यावं लागलं संभाजी भिडे हे नाव घेण्याची गरज का भासली. आपापल्या नावाने प्रबोधन करा. परxतु हे नाव घ्यायचं, आणि बहुजन समाजात जायचं, ते बरोबर नाही. ते बाहेर काय बोलतात हे सर्वांना माहिती आहे, त्याला आम्ही विरोध करणार’, असंही ते म्हणाले आहेत.