काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरूच, दोन भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

शोपियान – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्याचे (Terrorist attacks) दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या आठ महिन्यांत म्हणजे जानेवारीपासून आत्तापर्यंत काश्मीरमध्ये 27 जणांचा टार्गेट किलिंग अंतर्गत दहशतवाद्यांनी बळी घेतला आहे. काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. सुनील कुमार (Sunil Kumar) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आज शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम गावात आज दोन काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) बांधवांवर दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढले आहे. रविवारी नौहट्टा परिसरात एका पोलिसाची हत्या करण्यात आली होती. तर गेल्या आठवड्यात बांदीपोरामध्ये स्थलांतरीत मजुराला ठार मारण्यात आले होते. सोमवारी बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात दोन ग्रेनेड हल्ले देखील करण्यात आले.

दरम्यान, या वर्षी जानेवारी महिन्यात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची पहिली घटना समोर आली होती. 29 जानेवारी 2022 रोजी, जिल्ह्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली. यानंतर टार्गेट किलिंगच्या दहशतवादी घटनांना वेग आला. जानेवारीनंतर मार्चमध्ये काश्मीरमध्ये 8 जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे टार्गेट किलिंग अंतर्गत आतापर्यंत एप्रिलमध्ये पाच, मे महिन्यात सहा, जूनमध्ये तीन आणि ऑगस्टमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे.