स्वत:ला वाचविण्यासाठी माझ्यावर केले आरोप; परमबीर सिंह आणि वाझेंवर देशमुखांचा आरोप

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी हातमिळवणी करून माझ्यावर आरोप केले असं अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सांगितलं आहे. न्यायलयाने सीबीआयला (CBI) देशमुखांच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

आपल्यावरील सर्व आरोप हे तपासयंत्रणेच्या केवळ ‘इच्छा आणि कल्पनेवर’ आधारित आहेत, असे म्हणत देशमुख (Anil Deshmukh) यांनी सीबीआयने ज्या जबाबांचा आधार घेऊन गुन्हा नोंदवला आहे, त्या विधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह केले आहे.

संपूर्ण प्रकरण परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या जबाबांवर आधारित आहे. वाझे स्वतः अनेक प्रकरणांत अडकलेला आहे. तो स्वतः बार मालकांकडून पैसे वसूल करायचा, हे सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत. त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला सेवेत रुजू करण्यात आले. दोघांनीही स्वतःला वाचविण्यासाठी हातमिळवणी करत आपल्यावर आरोप केले, असे देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे.