शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष, २ जूनला अमरावतीत अभिवादन सोहळा

राजकमल चौकात आयोजन

२ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि अमरावतीतील तमाम श्रीशिव भक्तांनी त्रिवार अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि श्री शिव राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी अशी गौरवशाली घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रेरणादायी आणि पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरणारा व नवचैतन्य फुलवणारा आहे. संपूर्ण जगाच्या पाठीवर ऐसा राजा होणे नाही ! ३५० व्या श्री शिव राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करण्याकरिता आणि हिंदवी स्वराज्याचे स्मरण करण्यासाठी २ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक राजकमल चौकात श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात नागपूर येथील नामवंत गायक, गायिका आणि कलावंतांचा संच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करणार आहे. ढोलताशांच्या गजरात व आकर्षक आतिषबाजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्री शिवछत्रपतींचा धगधगता इतिहास मांडला जाणार आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडून महाराजांना सलामी दिली जाईल. कार्यक्रमाचा समारोप छत्रपतींच्या महाआरतीने होईल.

या सोहळ्याला भाजपा नेते खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, शहर भाजपाचे अध्यक्ष किरण पातूरकर, माजी आ. जगदीश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रदेश सचिव जयंत डेहणकर, लोकसभा प्रमुख राजेश वानखडे, प्रदेश सदस्य प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, ऍड. प्रशांत देशपांडे, किरणताई महल्ले, डॉ. नितीन धांडे, चेतन पवार, सुरेखाताई लुंगारे, संध्याताई टिकले, डॉ. अविनाश चौधरी, योगेश वानखडे, सुनील काळे, शिल्पाताई पाचघरे, मीनाताई पाठक, कुसुमताई साहू, सचिन रासणे यांच्यासह शहर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

अमरावतीकर बंधू भगिनींनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शिवराय कुळकर्णी व अमरावती – बडनेरातील शिवप्रेमींनी केले आहे.