9 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याचा कॉंग्रेसने केला शिवसेनेनेवर आरोप

मुंबई –  महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत उभ्या असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेवर (BMC) मोठा आरोप केला आहे. बीएमसीतील प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेंतर्गत बिल्डरांना दिलेल्या कंत्राटात ९ हजार ३८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी हा घोटाळा मुंबई महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे जाहीर केले आहे.

अधिक माहिती देताना रवी राजा यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, या प्रकल्पात टीडीआर, प्रीमियम आणि क्रेडिट नोट्सच्या माध्यमातून सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. बीएमसीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या संदर्भात काँग्रेसने बीएमसी आयुक्त आयएस चहल (IS Chahal), लोकायुक्त (Lokayukt) आणि केंद्रीय दक्षता यांच्याकडे तक्रार केली आहे.

बीएमसीने मुंबईतील वरळी, भांडुप, मुलुंड आणि चांदिवली या चार ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी १४ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रेडी रेकनरनुसार यासाठी 3 हजार कोटी रुपये खर्च व्हायला हवेत, परंतु महापालिकेने विकासकांच्या फायद्यासाठी 12 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. प्रीमियम क्रेडिट नोट्स, प्लॉट टीडीआर, बांधकाम टीडीआर यातून विकासकांना 9380 कोटी रुपयांचा फायदा दिल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा रवी राजा यांनी दिला आहे. रवी राजा यांनी एका प्रेस नोटद्वारे संबंधित बिल्डरांची नावेही जाहीर केली आहेत.