‘राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आजची बैठक’

मुंबई : शरद पवारांकडून (Sharad Pawar) राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या (Anand Dave) ब्राह्मण महासंघासह (Bramhan Mahasangh) प्रमुख संघटनांचा विरोध केला आहे. मात्र इतर छोट्या मोठ्या संघटना आणि या समाजाचे कथित नेतृत्व करणारे लोकं चर्चेसाठी जाणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtravadi Congress) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय (Nisarg Mangal Karyalay, MarketYard) येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांना आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर (Pradip Garatkar) यांनी केला.

दरम्यान, राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असताे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. राज्यातील बहुतांश ब्राह्मण संघटनांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये राजकारण वाटत आहे. मात्र संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे आयोजक, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.