नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर कॉंग्रेसमधील नेते नाराज ?

नवी दिल्ली – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे. खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.

दरम्यान,  शिवसेनेत बंडाळी माजली असताना आता कॉंग्रेसमध्ये देखील धुसफूस सुरु झाली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींच्या यादीतून माजी पालकमंत्री नितीन राऊत (Dr. Nitin Raut) आणि सतीश चतुर्वेदी (Satish Chaturvedi) यांच्या समर्थकांना वगळण्यात आल्याने शहरात मोठा असंतोष उफाळून आला आहे. असंतुष्टांनी लगेच बैठक घेऊन दिल्लीत (Delhi) न्याय मागण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेश प्रतिनिधींमध्ये प्रदेश सरचिटणीस तानाजी वनवे, संजय दुबे, नरेंद्र जिचकार, आर.एम. खान नायडू, हैदर अली दोसानी, सेवादलाचे कृष्णकुमार पांडे यांच्यासह सेवादल व महिला काँग्रेस (Congress) कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही यादी अद्याप अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र ती खरी असल्याचे असंतुष्टाचे म्हणणे आहे. सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.