भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

मुंबई – घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री मा.अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, अॅड.माधवी नाईक, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, अभियानाच्या संयोजिका .श्वेता शालिनी आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, गरीब कल्याणाच्या कार्यक्रमाबाबत पूर्वीही देशात बोलले जात असे, मात्र हे कार्यक्रम कधी प्रत्यक्षात आले नव्हते. मोदी सरकारने गरीब कल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक योजना सुरु केल्या. एक पैशाचाही भ्रष्टाचार न होता या योजनांचे लाभ गोरगरीबांपर्यंत पोहचत आहेत. धर्म, जात, पंथ न पाहता गरीबांपर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहचविले जात आहेत. वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांची पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा प्रदेश भाजपाचा उपक्रम अभिनंदनीय आहे. प्रदेश भाजपाने ठरवलेले अडीच कोटी लाभार्थ्यांची पत्रे पाठवण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीत साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्वरेने कार्यरत व्हावे असेही  फडणवीस म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील १३ कोटी जनतेपैकी ५ कोटी ६५ लाख लोकांना मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळाला आहे. यापैकी अडीच कोटी लाभार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. हे उद्दिष्ट नक्की साध्य करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे बावनकुळे यांनी अभिनंदन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हे अभियान सुरु केल्याबद्दल फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष आ.बावनकुळे यांचे अभिनंदन केले.