लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचाचा योग वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत – सावंत

पणजी :  कळंगुटचे माजी  सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपला मजबूत उमेदवार नव्हता. मात्र सिकेरा यांच्या रूपाने भाजपला कळंगुटमध्ये मजबूत उमेदवार मिळालेला आहे. सिक्वेरा हे कळंगुट पंचायतीचे अनेक वर्षे सरपंच होते. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग व मतदार आहेत . त्यामुळे कळंगुट सर करण्यास सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपच्या हाती एक मजबूत मोहरा  लागला आहे .

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, आमदार ग्लेन टिकलो,  माजी मंत्री दयानंद मांद्रेकर , माजी मंत्री दिलीप परुळेकर, काळंगुट भाजपचे नेते गुरुदास शिरोडकर आदींच्या उपस्थितीत सिक्वेरा यांना पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

त्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री  डॉ. सावंत म्हणाले की जोसेफ सिक्वेरा च्या रूपाने भाजपला एक चांगला नेता गवसला आहे. गोव्याच्या विकासासाठी जे जे लोक भाजपमध्ये दाखल होतील त्या सर्वांचे स्वागत आम्ही करत आहोत . गोव्याच्या आणि कळंगुटच्या विकासासाठी सिक्वेरा यांनी उचललेले पाऊल योग्य ठरणार आहे. माजी मंत्री मायकल लोबो यांना कळंगुट व शिवोली येथील नागरिक प्रथम नव्हे तर त्यांची पत्नी प्रथम आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देश प्रथम आणि त्यानंतर स्वतःचे हित असते.

लोबो यांना आपण मंत्री केले मात्र मंत्रिपदाचाचा योग वापर ते कळंगुटच्या विकासासाठी करू शकले नाहीत. पत्नीला उमेदवारी मिळावी या स्वार्थापोटी ते काँग्रेसमध्ये दाखल झालेत.  अशा या स्वार्थी नेत्याला कळंगुट आणि शिवोलुचे मतदार माफ करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले . भाजप सरकारने गोव्याचा भरीव विकास केला असून तो विकास लोकासमोर आहे. आणि त्यामुळे २०१२ मध्ये भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी  २२ पेक्षा जास्त जागा मिळणार असून त्यामध्ये कळंगुटची जागा असेल. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, लोबो हे बार्देशमध्ये बादशाह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच ते म्हापसा मतदार संघासह अन्य मतदार संघात देखील लुडबुड करत आहेत. हे सर्व सुरु असताना जोसेफ सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिल्याने आता लोबो यांना त्यांच्याच मतदार संघातून निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जोसेफ सिक्वेरा यांनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे लोबो यांना कळंगुटमध्येच अडकवून ठेवण्यात भाजप यशस्वी झाली आहे.