उमेदवारांना शपथ देणाऱ्या कॉंग्रेसवर होतेय चौफेर टीका; चिदंबरम यांच्यावर आली सारवासारव करण्याची वेळ

मुंबई – जागांच्या बाबतीत अनेक राज्यांच्या तुलनेत गोवा अगदीच लहान असला तरी येथील पक्षांतराचे राजकारण मात्र देशभर चर्चेचा विषय बनत असते. या राज्यात विजयापेक्षा नेत्यांच्या पक्षांतराचा प्रश्न आहे, म्हणून काँग्रेस सध्या मंदिर, मशिदी, चर्चच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला होता.विशेष म्हणजे आता निवडणूक जाहीर होऊन आणि उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाही अनेकजण पक्षबदल करत आहेत. बऱ्याच काळ पक्षातून आउटगोइंग सुरु असताना आता संधी पाहून पुन्हा काही नेते मंडळी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आता याच दलबदलू नेत्यांच्या भरवश्यावर आता कॉंग्रेस गोव्याच्या निवडणुकीत उतरली आहे.

दरम्यान, आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेत कॉंग्रेसकडून सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याचे वचन घेण्यात आले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि‌ बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. निवडणूक झाल्यानंतरही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे यावेळी सगळ्यांनी शपथ घेतली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसला या मुद्द्यावरून आता टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच जनतेमध्ये देखील यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश गेला असल्याचे दिसून येत आहे. जर कॉंग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मग जनतेने तरी या उमेदवारांवर विश्वास का दाखवावा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

याचसंदर्भात गोवा कॉंग्रेस प्रभारी पी. चिदंबरम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, ‘गोव्याच्या भूतकाळाच्या इतिहासात जर पहिले तर गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पक्षांतर झाले आहे. निवडणूक तोंडावर असतानाही राजकीय नेते पक्षबदल करत आहेत. त्यामुळे काल घेतलेली शपथ आवश्यक होती. आम्हाला आशा आहे की गोव्यातील लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील आणि आमचे सरकार निवडून देतील.’