‘सायकल-पेडल फॉर बेटर लाईफ’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला…

‘सायकल..’ असे क्वचितच कोणी असेल ज्याला सायकल माहित नाही किंव्हा ज्याने कधी सायकल चालवली नसेल. अशी आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली सायकल जेव्हा फक्त आवड वा खेळणे न राहता आपल्या आयुष्याची सायकल नीट रहावी म्हणून गरजेची होते, तेव्हा त्याच सायकलकडे बघण्याचा बदलणारा दृष्टीकोन यावर भाष्य करणारा ‘सायकल-पेडल फॉर बेटर लाईफ’ ( saykal-pedal for better life) हा लघुपट नुकताच पॉकेट फिल्म्सच्या माध्यमातून यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे.

मनोरंजनासोबतच एक आरोग्यविषयक संदेश देणाऱ्या या लघुपटाची आजवर अनेक फिल्म फेस्टिवल्स, सामाजिक उपक्रम, जनजागृती अभियानांमध्ये दखल घेतली आहे. सायकलिंगमुळे शरीराचा समतोल राखण शक्य असलं तरी सर्रास सायकलकडे पाठ फिरवली जाते. जसे वय वाढते तसे सायकल आपल्या आयुष्यातून निघून जाते किंबहुना आपण ती दूर करतो, पण वयानुसार ती आपली आवड जरी राहत नसली तरी तिची गरज आणि महत्व मात्र असतेच आणि ते वेळ आल्यावर आपल्याला समजते. अश्या प्रकारे आपल्याला गुंतवून ठेवणारा ११ मिनिटांचा हा लघुपट खूप काही सांगून जातो, तेव्हा प्रत्येकाने हा लघुपट किमान एकदा तरी आवर्जून पहावा हे मात्र नक्की.

लक्ष्मी बालाजी फिल्म्स निर्मित गोल्डस्मिथ मिडिया अँड कॅम्पेनिंग सर्विसेसच्या सहयोगाने हा लघुपट तयार झाला असून चैतन्य देसाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. संदिप राजेंद्र सोनार यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी लहानग्यांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांना समजेल अशा सोप्या पण तितक्याच प्रभावीपणे पार पाडली असून कलाकारांचा अभिनय त्यात भर घालतो. सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, गणवेश चित्रपटातील बालकलाकार तन्मय मांडे, शिवकांता सुतार, निलेश कुलकर्णी, संदिप सोमण, हर्ष कालेकर, आदित्य कामत यांनी अभिनय केला आहे. सचिन केदारी यांनी छायांकन व संकलन, वर्षा मराठे कुलकर्णी यांनी रंगभूषा तर कैलास पवार यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.