‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा – बोंडे 

Mumbai – केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे  राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.

डॉ. बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारने अलीकडेच सोयाबीन आणि तेलबियांच्या साठ्यावरील निर्बंध हटविले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत असले तरी देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे दर तुलनेने कमीच आहेत. खाद्यतेलाच्या दरातील वाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी तेलबियांच्या आणि सोयाबीनच्या साठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेऊन साठा मर्यादा किती असावी याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले होते. मात्र राज्यांनी साठा मर्यादा न ठरविल्यामुळे केंद्र सरकारने मर्यादा ठरवून डिसेंबर २०२२ पर्यंत हे निर्बंध राहतील असे जाहीर केले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. मात्र देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्याने तसेच साठा मर्यादा, वायदेबंदीमुळे दर कमीच आहेत. केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध काढून टाकल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणखी एक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा मोदी सरकारचे अभिनंदन करीत आहे, असे डॉ. बोंडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.