निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर; रश्मी ठाकरेंवरही दीपाली सय्यद यांची टीका

मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी बुधवारी (०९ नोव्हेंबर) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी बुधवारी सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. तसेच ठाकरे गटातील नेत्या निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

“रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,” असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.

“खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे,” असंही त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटावर नाराज होत्या दिपाली सय्यद 
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात असलेल्या दिपाली सय्यद या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्या शिंदे गटात सहभागी होतील का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयत्न करावेत, असे वक्तव्य त्यावेळी दिपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे गटावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

यानंतर आता बुधवारी त्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी (Dipali Sayyed Meets Eknath Shinde) त्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “मी येत्या तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे. तसंच मला जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारण्यास तयार आहे.” आता शिंदे गटात त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली?, हे पाहाणे महत्त्वपूर्ण असेल.