प. बंगाल विधानसभेत हाणामारी; भाजप नेत्याने एका बुक्कीत फोडले आमदाराचे नाक ?

कोलकाता : बीरभूम येथील जळितकांडावरून सध्या बंगालमध्ये वातावरण तापले आहे. यातच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्यासह भाजपच्या ५ आमदारांना निलंबित केले. अधिकारी यांनी एका प्रतिस्पर्धी आमदाराचे नाक फोडल्याचा आरोप आहे.

सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजपचे आमदार हौद्यात उतरले आणि बीरभूम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आठ जणांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवेदन करावे अशी त्यांनी मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे भाजप आमदार वेलमध्ये उतरले. यानंतर तृणमूलचे आमदारही वेलमध्ये उतरले. त्यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं.

दरम्यान, यानंतर भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये विधानसभेतच तुफान हाणामारी झाली. आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांचे कपडे फाडले. या हल्ल्यात अनेक आमदार जखमी झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गदारोळानंतर भाजपच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 21 मार्च रोजी बीरभूमच्या रामपूरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर संतप्त जमावाने 10 घरे जाळली. ज्यात महिला आणि मुलांसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने आज या संपूर्ण प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांसह आणखी काही लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआय या संपूर्ण घटनेचा अहवाल 7 एप्रिल रोजी न्यायालयात सादर करणार आहे.