करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तळतळाट रोहित पवारांनी घेऊ नये’

करमाळा (प्रतिनिधी) –  गेल्या तीन वर्षांपूर्वी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना  (Adinath Sahkari Sakhar Karkhana) भाडे कराराने घेतला त्यावेळी तालुक्यातील सर्व जनतेने रोहित पवार यांचे स्वागत केले. मात्र नंतर रोहित पवार यांनी आपले खरे दात दाखवत आदिनाथ कारखाना जाणीवपूर्वक तीन वर्षे बंद पाडला करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane farmers) चुलीत पाणी ओतून त्यांचे प्रपंच उध्वस्त करण्याचे काम गेले तीन वर्षापासून आमदार रोहित पवार करत आहेत आता तरी रोहित पवार यांनी या प्रक्रियेतून बाजूला व्हावे. करमाळ्याच्या शेतकऱ्यांचा तळतळाट आमदार रोहित पवार यांना महागात पडेल असा इशारा मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल (Devanand Bagal) यांनी दिला आहे.

आमदार रोहित पवार यांनी राज्य सहकारी बँक यांना हाताशी धरून राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या सत्तेचा गैरवापर करून आदिनाथ कारखाना पंचवीस वर्षे भाडे कराराने घेण्याचा घोळ घातला. शिवाय दिल्लीच्या बँकेचे कर्ज फेडणार नाही अशी आडमुठी भूमिका घेऊन आदिनाथ कारखाना तीन वर्षे बंद ठेवला. याचे कारण म्हणजे गतवर्षी बारामती ॲग्रो चे विस्तारीकरण झाले होते. त्यांना अतिरिक्त 8 लाख मॅट्रिक टन उसाची आवश्यकता होती. आदिनाथ कारखाना बंद ठेवला तरच बारामती ॲग्रो कारखान्याला करमाळा तालुक्यातील ऊस मिळणार. या स्वतःच्या प्रपंचाच्या स्वार्थासाठी आमदार रोहित पवार यांनी गतवर्षी आदिनाथ कारखाना बंद ठेवला.

गतवर्षी करमाळा (Karmala) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड हाल झाले एकरी ऊस तोडण्यासाठी 20 20 हजार रुपये खर्च करावा लागला .अनेकांनी ऊस पेटवून दिला करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर ही जी वेळ आली या पापाचे बाप आमदार रोहित पवार आहेत.आमदार रोहित पवार चे एजंट म्हणून काम करणारे सुभाष गुळवे करमाळा तालुक्यातील स्वाभिमान असलेला आदिनाथ कारखान्याच्या व्यवहारातून दलाली मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. जनता त्यालाही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी हा साखर कारखाना उभा करण्यासाठी 25 वर्षे पायात चप्पल घातली नाही. कै. शंकराव मोहिते पाटील कै. गिरीधरतासदेवी कै. रावसाहेब पाटील डॉक्टर पानाचं गांधी या नेते मंडळींनी हा कारखाना उभा केला.सुभाष गुळवे आदिनाथ चे व्हाईस चेअरमन असताना त्यांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार करून आदिनाथ मातीत घातला याची सर्व जनता साक्षीदार आहे आता हेच  सुभाष गुळवे पुतना मावशी चा आव आणत आहे.

आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असून सहकारी तत्त्वावर हा साखर कारखाना चालावा संपूर्ण तालुक्यातील जनतेची इच्छा आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आमदार राम शिंदे (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadwanis, MLA Ram Shinde) यांनी याबाबतीत पुढाकार घेतला असून हा कारखाना सहकार तत्त्वावर चालविण्यासाठी सर्व करमाळा तालुका सज्ज असल्याचे देवानंद बागल यांनी शेवटी सांगितले.