म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील – ज्योशुआ डिसोझा

पणजी : भाजप सरकारच्या मदतीने माझ्या आमदारपदाच्या कारर्किदीत म्हापशात अनेक विकासकामे राबवण्यात आली. उर्वरीत कामे नजीकच्या काळात लवकरच पूर्ण केली जातील. आगामी निवडणुकीत मी नक्कीच विजयी होणार याची मला खात्री असल्याचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. सध्या त्यांनी मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क मोहीम राबवलेली आहे.

माजी आमदार रोहन खंवटे म्हणाले, आगामी निवडणुकीत भाजपच बहुमताने सरकार स्थापन करेल व त्या सरकारात म्हापशातील जोशुआ डिसोझा यांचाही समावेश असेल. लोकांमध्ये फूट घालून स्वतःला ‘टुगेदर’ म्हणणार्‍यांची बार्देशवासीयांना गरज नाही. स्वतः पक्ष सोडून लोकांमध्ये फूट घालणाऱ्यांचा स्वीकार मतदार कदापि करणार नाहीत, असा दावा करीत खंवटे यांनी लोबोंवर टीका केली. जोशुआ डिसोझा हे स्वतःच्या अस्तित्वावर लढत आहेत, इतरांप्रमाणे दुसर्‍यांचा टेकू घेऊन नाही, असे म्हणत रोहन खंवटे यांनी माजी मंत्री मायकल लोबो व काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्यावर टीका केली.

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर म्हणाले, की माजी आमदार बाबूश डिसोझा व माझे नाते काय होते हे संपूर्ण बार्देशकारांना माहिती आहे. स्व. बाबूश हे एकूण पाच वेळा म्हापशातून जिंकून आले. त्यानंतर, पोटनिवडणुकीत ज्योशुआ विजयी झाले. आगामी निवडणुकीत जोशुआ हे पुन्हा जिंकतील, अशी खात्री आहे. जोशुआ यांना लागणारे सर्व सहकार्य देणार असून विरोधकांच्या अपप्रचाराला मतदार बळी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले.

म्हापसेकरांचे जोशुआंवर प्रेम : खंवटे

जोशुआ डिसोझा यांची म्हापसेकरांना नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या कारर्किदीत जोशुआ यांनी बर्‍यापैकी काम केले आहे, असे म्हणत रोहन खंवटे म्हणाले, की काही जणांनी भाजपमध्ये राहून स्वतःचा फायदा करून घेतला आणि आता ते दुसरीकडे जाऊन बोलताहेत. जोशुआ यांच्यासोबत म्हापसा पालिका मंडळ तसेच सर्व मतदार आहेत. जोशुआ हे पक्षाचे स्वाभिमानी उमेदवार असून ते इतरांप्रमाणे कुणा एका व्यक्तीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहत नाहीत. जोशुआ यांच्यावर म्हापसेकरांचे प्रेम व विश्वास असून ते मोठ्या मताधिक्क्याने जिंकतील, असा विश्वास रोहन खंवटे यांनी व्यक्त केला.