नड्डा यांच्या वक्तव्याचा ठाकरेंनी समाचार घेतल्यावर फडणवीसांनी केली सारवासारव 

मुंबई – देशभरात विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरु झाल्यानंतर भाजपवर (BJP) विरोधक टीका करत आहेत. प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्लान सुरु असल्याची टीका विरोधक करत असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले.

यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, जे. पी. नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं २०-३० वर्षे इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्व शून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे.

महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

दरम्यान, आगामी काळात सर्व प्रादेशिक पक्ष संपवून भाजप हा एकमेव पक्ष उरेल, या जे पी नड्डांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना प्रतिक्रिया विचारली, असता त्यांनाही यावर फारशी स्पष्ट प्रतिक्रिया देता आली नाही. नड्डा यांचं ते वक्तव्य ठाकरेंसाठी होतं, असं म्हणून फडणवीसांनी वेळ मारून नेली. जे पी नड्डांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपतेय असं म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वातील शिवसेनेबाबत त्यांनी असं वक्तव्य केलेलं नाही. लोकांच्या मनात याबाबत संभ्रम तयार करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.