वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धायरीकर हैराण; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? 

पुणे   : धायरी आणि डीएसके विश्व परिसरातील (Dhairi and DSK Vishwa Campus) नागरिकांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.  धायरी फाटा ते धायरी गाव(Dhayari), डीएसके विश्व(DSK vishwa), तसेच बेनकर वस्ती (Benkar Wasti)आणि नऱ्हे (Narhe) परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या भागात मोठी लोकवस्ती असल्याने या भागातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.

अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान आणि वाहतूक कोंडी

नऱ्हे परिसरात औद्योगिक वसाहत आहे यामुळे या रस्त्यांवरून मोठी अवजड वाहनं मालाची वाहतूक करत असतात तसेच धायरी परीसरात खाण व्यवसाय (mining business) असल्याने मोठी व्यावसायिक वाहन देखील बेनकर वस्तीमार्गे या ठिकाणी  पोहोचतात. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळेच बेनकर वस्ती परिसरातून या अवजड वाहनांच्या वाहतुकीला देखील बंदी घालावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

 सिग्नल देखील अनेक दिवसांपासून बंद  

धायरी मुख्य चौकातील सिग्नल आणि धायरी फाट्यावरील सिग्नल देखील अनेक दिवसांपासून बंद आहे. खरं तर तो फक्त एक शोभेची वस्तूच आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगे ठरणार नाही. मात्र यामुळे वाहनचालक  बेदरकारपणे वाहन चालवतात त्यामुळे देखील येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण झाल्याने सुद्धा वाहतूक कोंडीत भर टाकत आहे. हॉटेल, बार,वाईन शॉपी यासमोर होणारी गर्दी सुद्धा वाहतूक कोंडीस कारणीभूत आहे.

रस्त्यावरील खड्डे 

पटापट कामे संपविण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत हे आता समोर येत आहे. अनेकजण या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.  मध्यंतरी नगरसेवकांनी काही कामाच्या निमित्ताने रस्त्याची खोदाई केली होती मात्र त्यानंतर तो रस्ता व्यवस्थितपणे पूर्वी सारखा न केल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे असून अनेक ठिकाणी खड्डे  पडले आहेत असं धायरीतील नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी  भरले जात असून  खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे वारंवार अपघात होत असतात. सध्या पालिकेचा कारभार प्रशासनाच्या हातात असल्याने माजी नगरसेवक सुद्धा हात वर करताना दिसत आहेत.  अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे हा सर्व त्रास जनतेला सोसावा लागत आहे. या रोडवर लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना अजुन किती अपघात हवे आहेत ?असा संतप्त प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.