तुम्ही मोदी शहांचे आणि फडणवीसांचे पोलीस घेऊन जाहीर चर्चेला या; चौधरींचे पोंक्षे यांना आव्हान 

पुणे –  सावरकर (Savarkar) नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत, आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं अभिनेते शरद पोक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी  म्हटलं आहे. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्यावतीने ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे  यांनी हे वक्तव्य केले आहे.

जेव्हा ८० टक्के हिंदुंना दुखवायचं असले, ८० टक्के हिंदुंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज (Hindu society) दुखावतो इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती, काँग्रेसला होती आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं मत  पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

यावरून आता  सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी  हे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी थेट शरद पोंक्षे यांनाच आव्हान दिले आहे. ते म्हणाले, दहशतवाद विरूद्ध संविधान… पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो. तुम्ही मोदी शहांचे दिल्लीचे पोलीस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलीस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो. आहे का तयारी? असं त्यांनी म्हटले आहे.