शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद ?

Mumbai –  विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan parishad election) ही शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सीएम उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. झी २४ तासने  अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिले आहे. मुंबईत बोलवूनही नेतृत्वानं आमदारांची भेट न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचं  बोललं जात आहे.