ड्रग्ज आणि पबजी खेळणाऱ्या मंडळींना योग्य दृष्टी देण्यासाठी अग्निपथ योजना महत्त्वाची –  कंगना रनौत

मुंबई –  केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत.

आंदोलकांवर प्रशासनाकडून कारवाईही केली जात आहे. आतापर्यंत, यूपीच्या 4 जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी 6 एफआयआर नोंदवले आहेत, तर 260 लोकांना अटक केली आहे. वाराणसीमध्ये सर्वाधिक ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, बलियामध्ये सर्वाधिक अटक करण्यात आली असून, आतापर्यंत येथे 109 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने मात्र या योजनेचे समर्थन केलं आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,  इस्रायल सारख्या देशांनी तरुणांना सैन्य दलात भरती करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आयुष्यातील काही वेळ देशसेवेत घालवतो. तसेच सैन्य दलाचे काम त्यांना जवळून पाहता येते. अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे. ड्रग्ज आणि पबजी खेळणाऱ्या मंडळींना योग्य दृष्टी देण्यासाठी अग्निपथ योजना महत्त्वाची ठरणार आहे.