‘नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाच्या हक्काबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा’

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या तसेच अजून कोणताही गुन्हा शाबित न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा अशी आमची मागणी होती. मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आणि त्यांच्या हक्काचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. यासंदर्भात पुढील पावले टाकण्याबाबत नवाब मलिक व अनिल देशमुख यांचे वकील भूमिका ठरवतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.