मंत्रिमंडळ विस्तारात पुण्यातून  कोणाला लागणार लॉटरी? ‘या’ तीन नेत्यांच्या नावाची चर्चा

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय. मंत्रिमंडळासाठी पुण्यातूनही काही नावांचा विचार केला जात आहे. त्यामुळे  पुण्यातून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) , दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) आणि पुणे शहरातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये किमान एका नेत्याला मंत्रीपद मिळावं, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून होतं आहे. त्यात महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना यंदा संधी मिळते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.शिंदे-फडणीस सरकारमध्ये एकही महिला मंत्र्याचा समावेश नाही आहे त्यामुळे पुण्यातील एकमेव महिला आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.