कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोष; दुर्गम प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट सुपूर्द

पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने कोंडकेवाडी (ता. पुरंदर) या दुर्गम गावातील ६५ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, एक महिन्याचा किराणा व नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोष साजरा झाला.

‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता.१६) स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पूरंदर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कोंडकेवाडी येथे जाऊन दिवाळी साजरी केली. ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आजी-आजोबांचे औक्षण करून त्यांना नवीन कपडे देण्यात आले.

गावातील ६५ कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले. गावातील ९३ महिलांना साड्या, ८० मुलामुलींना, तसेच २८ ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडेही देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रसाद खंडागळे, स्वाती सेठ, रविंद्र पठारे, अॅड. प्रमोद पवार, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, सुनील अमरनाणी, प्रशांत पेंडसे, ओंकार जाधव, निखील बिबवे, नितीन शहा, सुरेश ढमढेरे, राजेंद्र बलकवडे, संतोष कसपटे, सिद्धेश जाधव, प्रसाद गाढवे, दिपक पोकळे, महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, उमा चिकणे, कविता शिंदे, सुनंदा मोरे, रोहिणी जाधव, अंजली वाळके, नीलम खंडागळे आदींनी सहकार्य केले.