Diwali Special Recipe: शंकरपाळीसारखी चविष्ट पाकातील चंपाकळी, मुले-बाळे आवडीने खातील

Diwali Special : दिवाळी (Diwali) हा सण जवळ आला आहे. त्यामुळे प्रत्येक घरात साफसफाई, फराळ बनवण्याची लगबग सुरू असेल. शंकरपाळी, करंजी, चकली, चिवडा हे खासकरून दिवाळीत बनवले जाणारे पदार्थ (Diwali Special Faral) आहेत. असाच एक स्वादिष्ट आणि बनवायला सोप्या अशा पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ताईंनो, या पदार्थाचे नाव आहे, चंपाकळी (Champakali).

चंपाकळी म्हणजे एका विशेष आकाराची गोड खारी शंकरपाळी. चंपाकळी ही खारी आणि गोड दोन्ही प्रकारची असते. महाराष्ट्रातील या विशेष पदार्थाची चव तर एकदा चाखून पाहायला हवीच! मग ही चंपाकळी बनवायची कशी?, त्यासाठी लागणारे साहित्य कोणते आहे?, जाणून घेऊया.. (Champakali Recipe)

चंपाकळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
४०० ग्रॅम मैदा, २ टी स्पून तेल, १ टी स्पून मीठ, पाकासाठी १ कप साखर आणि १ कप पाणी, आवडीनुसार २ रंग

जर पाकातल्या चंपाकळी करायच्या नसतील तर तुम्ही पीठी साखरेतील चंपाकळीही बनवू शकता.

त्याकरिता साहित्य- ½ कप पीठी साखर आणि तळण्याकरिता वनस्पती तूप किंवा डालडा.

चंपाकळी बनवण्याची कृती –
प्रथम गॅसवर तेल कोमट करून घ्यावे. एका परातीत मैदा घेऊन त्यात मीठ घालावे. मग कोमट तेल पीठात ओतावे. आता संपूर्ण मिश्रण फेसून घ्यावे आणि चांगले एकजीव करावे व पीठाचे समांतर दोन भाग करावे. दोन्ही भागात तुमच्या आवडीचे रंग घालून दोन घट्ट गोळे तयार करावेत. आता तयार गोळे २ तासांसाठी मुरवत ठेवावे. एका भांड्यात साखर आणि पाणी मिक्स करून दोन तारी पाक तयार करावा. २ तासानंतर पुन्हा गोळे मळून घ्यावे. प्रत्येकी गोळ्याचे छोटे गोळे तयार करून पुरीसारख्या पोळ्या तयार कराव्यात. आता पोळीला काचणीच्या साहाय्याने मधून चीरा पाडाव्यात. अशाच प्रकारे सर्व पोळीला चीरा पाडून घ्याव्यात. आता दोन वेगवेगळ्या रंगाच्या पोळ्या घ्याव्यात आणि चंपाकळी तयार करून घ्यावी.

एका कढईत तूप किंवा डालडा मध्यम गॅसवर गरम करून घ्यावा आणि तयार चंपाकळ्या तळून घ्याव्यात. तयार चंपाकळ्या कोमट पाकात घोळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात.