राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमच्या नेत्यांना बदनाम करू नका अन्यथा रस्त्यावरून फिरताना अवघड होईल – चव्हाण

मुंबई – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे.

दरम्यान, शिंदे गटासोबत गेलेल्या अनेक नेत्यांनी या फुटीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांनी निधी वाटपात केलेला भेदभाव तसेच शरद पवारांचे कुटील राजकारण हे शिवसेनच्या फुटीमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक आमदारांनी यावरून राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. तसेच आज माजी मंत्री रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा आजराष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.  दरम्यान, या टीकेवरून आता राष्ट्रवादी (NCP) देखील आक्रमक झाली असून राष्ट्रवादी युककचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या नेत्यांना थेट धमकी दिली आहे.

ते म्हणाले,  महाविकास आघाडी (MVA) ही अनैर्गिक आघाडी होती हे समजायला या अनुभवी नेत्यांना अडीच वर्षांचा कालावधी गेला याचं मला आश्चर्य वाटतं. खरतर आज कोण कशासाठी त्या गटात सामील होत आहे, कुणाच्या फायली कुठे अडकल्या आहेत, कुणावर अटकेची टांगती तलवार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. उगाच राष्ट्रवादीला नाहक बदनाम करण्याचे काम या नेत्यांचे मार्फत होत आहे. या नेत्यांचे म्हणणे आहे की शरद पवारांनी शिवसेना फोडण्याचे काम केले. शिवसेना कोण फोडतय कुणाच्या माध्यमातून फोडलं जात आहे? कुणाला ED च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे ? कुणाला Income Tax च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे ? कुणाकडे कश्या बॅगा पोहचवल्या गेल्या आहेत? हे या महाराष्ट्राला माहित आहे. उगाच राष्ट्रवादीला बदनाम करू नका अन्यथा रस्त्यावरून फिरणं अवघड होईल अशी धमकीच चव्हाण यांनी दिली आहे.