पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका; चंद्रकांतदादांची घणाघाती टीका

पुणे – मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात पाय आडवा घालण्याचे काम केलेले आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देत राज्य सरकारनेही पुण्याच्या विकासाबाबतची उदासिनता कृतीतून दाखवून दिलेली आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ते म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखविला. केवळ पाच वर्षांत भूमीपूजन ते उद्घाटन हा वेग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षमतेचे उदाहरणच होते. शहरांच्या विकासाचे प्रकल्प भाजपा प्रभावीपणाने आणि वेळेत पूर्ण करतो, हा विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण करणारी ही घटना होती. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमीपूजन करून तोही वेळेत पूर्ण होणार, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपशकून करण्याचे सूतोवाच गेल्याच आठवड्यात खासदार शरद पवार यांनी केले होते. काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय गुणात्मक नसून राजकीय आहे.

नदी पुनरूज्जीवन प्रकल्प किती संवेदनशील आहे, याची भारतीय जनता पार्टीस पूर्ण कल्पना आहे. हा प्रकल्प भाजपाच्या कल्पनाभरारीतून आलेला नाही तर पूर्ण अभ्यासांती होतो आहे. हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प असल्याची आवई उठवून त्याला विरोध करण्याचा पवार यांचा प्रयत्न त्यांना शोभणारा नाही. नद्या आणि पाणी या संदर्भात शिखर संस्था असलेल्या सीडब्लूपीआरएसने जलसंपदा खात्याच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाच्या हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स अभ्यासास डिसेंबर २०१७ मध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास पाच वर्षांच्या पूर्वाभ्यासानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत जलसंपदा खाते, सीडब्लूपीआरएस, लोकप्रतिनिधी, विविध पर्यावरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमकर्मी, या प्रकल्पाशी निगडित असलेल्या नागरिकांशी संवाद केला गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादात या प्रकल्पासंदर्भात आलेल्या सर्व रास्त मुद्द्यांचे निराकरण झाल्यावरच या प्रकल्पाच्या निविदा निघाल्या.

नदीत सांडपाण्याचा व दूषित पाण्याचा एक थेंबही जाणार नाही, यासाठी ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापालिकेकडे असलेले मर्यादित आर्थिक स्रोत लक्षात घेउन मोदी सरकारने जायकाकडून ९९० कोटींचे कर्ज घेऊन त्यातील ८४१ कोटी रुपये अनुदानस्वरूपात महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

माननीय शरद पवार पुण्याचा विकास तुम्ही करू शकता, असा भ्रम तुम्ही गेली पन्नास वर्षे पुणेकरांच्यात जोपासलात. परंतु तुमच्या दुर्देवाने पुण्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार आल्यावर पुणेकरांना विकास वेगाने होऊ शकतो आणि वेळेत होऊ शकतो, याचे प्रत्यंतर आले. २०१२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात ‘नदीसुधार योजना राबवविणार,’ असे आश्वासन दिलेले होते. त्या कारकिर्दीत तुमच्या पक्षाची निर्विवाद सत्ता होती. परंतु त्या पाच वर्षांत आपल्याकडून त्याबाबत कोणतेही पाऊल पुढे पडले नाही. त्यानंतर २०१७च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुन्हा नदीसुधार योजनेअंतर्गत काय काम करणार, याचा उल्लेख केलेला आहे.

पवारसाहेब, पुण्याच्या नदीची झालेली ओंगळवाणी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती म्हणूनच या नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. केंद्र सरकार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा सर्वांगाने अभ्यास करता आला. आणि त्यानंतच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे.

पुण्याचा विकास आपल्या सहभागाशिवाय कसा होऊ शकतो, या अहंकारापोटी आपण नदी पुनरूज्जीवन प्रकल्प रेंगाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आपणास शोभा देणारे नाही. पुण्याच्या पर्यावरणात, आरोग्यात, सौंदर्यात आणि अर्थकारणात भर घालणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मन मोठे करा. असं देखील पाटील म्हणाले.