‘गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, मग महाराष्ट्रातील का नाही?’

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज खा. शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

अमोल कोल्हे भाषणात पुढे म्हणाले की, देशातील कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भुज भूकंपावेळी शरद पवार यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील वाहवा केली होती, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी यावेळी करुन दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल. संसद भवनातला शिवरायांचा पुतळा सुद्धा याबद्दल समाधान व्यक्त करेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.