गंभीर तू मैदानावर खासदार नाहीस; विराट-गंभीरमधील वादावरुन तापलं कर्नाटकातील राजकारण

लखनऊ- विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वैर कुणापासून लपून राहिलेले नाही. आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर भिडले. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील साखळी फेरीतील 43व्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले. आता या वादावरुन कर्नाटकातील राजकारण तापले आहे.

काँग्रेसचे कर्नाटकमधील युवा नेते श्रीनिवास (Srinivas BV) या वादावरुन गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. श्रीनिवास यांनी विराट आणि गंभीरच्या बाचाबाचीचा व्हिडिओ शेअर करत भाजपचा खासदार असलेल्या गौतम गंभीरवर निशाणा साधला. श्रीनिवास आपल्या फेसबुकमधील पोस्टमध्ये म्हणतात की, ‘प्रिय गौतम गंभीर तू मैदानाबाहेर भाजपचा खासदार असशील मात्र मैदानावर तू खासदार नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे.’