पाय धुतलेले पाणी प्या, स्पर्धा परीक्षेत यश मिळवा; भोंदूगिरी करून युवकाची फसवणूक

MPSC Student Fraud: पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाठ या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दापाश केला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना सदर महिला आणि साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली. महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यानी सदर प्रकरणी शहानिशा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६) विशाल विमल हे पिडित युवक व साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण, मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले. रिसेपशनिस्ट माया गजभिये आणि सतिष वर्मा हे बाहेरच्या रुममध्ये बसले होते. विशाल यांना कन्सल्टींग फी एक हजार रुपये भरावयास लावून त्यानंतर विशाल यांना आतमधील रुममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. सदर महीला ही आघोरी, अनिष्ठ, जादुटोणा प्रकार करुन लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलीसांना आतमध्ये बोलावले. पोलीसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करुन जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने सदर युवक नैराश्येमध्ये होतो. समुपदेशक महिला असल्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक सदर महिलेकडे सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेने अतेंद्रीय शक्तीने समस्या ओळखल्याचे सांगितले. युवकाचे आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असे सांगुन ते वाढविण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख खाण्यास दिली. त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणी पोटाचा विकार झाला. सदर महिलेने तिच्या अंगात अतेंद्रिय शक्ती असल्याचे सांगुन गंडा न बांधल्यास युवकाला मृत्युची भीती घातली. नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असे भाकीत करुन युवकाची सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणुक केली आहे. तसेच सदर महिलेने युवकाकडून स्वतःची पुजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. त्यामुळे त्याला पोटाचे विकार झाले. सदर महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले