माझ्यापेक्षा पवार साहेबांची आणि भाजपची दोस्ती चांगली आहे – जानकर

नवी दिल्ली – माजी मंत्री महादेव जानकर यांनीही भाजपला मोलाचा सल्ला दिला आहे. जर योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा बारामती मतदारसंघात पराभव अटळ आहे, असं जानकर यांनी म्हटलं. जानकर पवारांच्या जवळ आहेत का? या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. असं काही नाही, माझ्यापेक्षा पवार साहेबांची आणि भाजपची दोस्ती चांगली आहे, असे जानकर म्हणाले.

महादेव जानकर म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एकाबाजूला धरण आणि दुसऱ्याबाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडली अशी अवस्था आहे. इंदापुर तालुक्यातील ३२ आणि बारामतीतील २६ गावांच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मुळशी, दौंड याठिकाणीही समस्या प्रलंबितच आहे. निर्मला सीतारामन या बारामतीत लक्ष देत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे.

बारामतीच्या जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. मला पावणे पाच लाख मतदान केले होते. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. भाजपानं रासपला हा मतदारसंघ द्यायला हवा होता. २०१९ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झाले नव्हते हेदेखील पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवारांच्या दृष्टीने भाजपाने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे हा माझा सल्ला आहे असं त्यांनी म्हटलं.