ED चा धडाका सुरूच : संजय राऊतांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त  

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्ट्राचाराच्या विरोधात ईडीने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.  यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.