‘एकतर मी आत्महत्या करेन, नाहीतर…’, चित्रा वाघ वादावर अभिनेत्री उर्फी जावेदचं गंभीर विधान

Urfi Javed & Chitra Wagh Crisis: मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील सोशल मीडिया वॉर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर नंगानाच करणाऱ्या उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिच्यावर कारवाईची मागणी केली. यावर प्रत्युत्तर देताना उर्फीनेही चित्रा वाघ यांना त्यांची संपत्ती उघड करण्यास सांगत आव्हान दिले. यानंतर आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी उर्फी समोर दिसताच तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली. आता या वादावर उर्फीने गंभीर विधान केले आहे, ज्यानंतर हा वाद थांबण्याची शक्यता दिसत आहे.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते. मात्र, सोशल मीडियावर केवळ मनोरंजन म्हणून तिच्याकडे पाहिलं जात. पण, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू आहे. एकीकडे चित्रा वाघ यांची उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार, तर दुसरीकडे उर्फीनेही सोशल मीडियावरुन चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देण्याचा धडाकाच लावला आहे. उर्फीने इंस्टाला आणखी स्टोरी शेअर करत गंभीर विधान केलं आहे.

“राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फीने केलं आहे. त्यामुळे, हा वाद कुठेतरी संपुष्टात येईल, असे दिसून येते.

दरम्यान उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादात आता संजय राठोड यांचे नाव ओढले गेले आहे. शिंदे गटातील नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांची आठवण करून देत उर्फीने चित्रा वाघ यांची बोलती बंद केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम आणि ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘ही तीच महिला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजय राठोडच्या अटकेसाठी ओरडत होत्या. त्यानंतर लाच घेतल्यामुळे त्यांचा पती निशाण्यावर आला. पतीला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय आणि चित्राजी एकमेकांचे चांगले मित्र बनले. मीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आम्ही दोघीसुद्धा चांगल्या मैत्रिणी होऊ’, असा उपरोधिक टोला तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लगावला.