“जीभ हासडून टाकू” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले… 

 Khed – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) विधानाचा समाचार घेतला आहे. आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हासडून टाकू, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले,  काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं हे विधान हास्यास्पद आहे. रोज उठसूट शिव्या-शाप देणं, आरोप करणं, तपास यंत्रणा, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर बोलणं, असे प्रकार रोज सुरू आहेत. कालच्या सभेत स्वातंत्रसैनिकांबातही त्यांनी भाष्य केलं. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेबांनी जे कधीच केल नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार त्यांनी २०१९ ला गमावला आहे”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.