महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली – महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी दि. १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल (Piyush Goyal), पी. चिदंबरम (P. Chidambaram), प्रफुल्ल पटेल (Praful Patel, डॉ. विकास महात्मे (Dr. Vikas Mahatme), संजय राऊत (Sanjay Raut ) आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे (Dr. Vinay Sahastrabuddhe) यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त  होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी  १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ३ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून  सायंकाळी ५ वाजता मतमोजणी  होऊन निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.