2024 मधील निवडणुकीचा निकाल लोकांना आश्चर्यचकित करेल; अमेरिकेतून राहुल गांधीची डरकाळी 

Rahul Gandhi in America :  काँग्रेस नेते राहुल गांधी   अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते सातत्याने भाजपवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी विरोधक एकत्र येण्याचा विश्वास व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले, ‘मला वाटते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष खूप चांगली कामगिरी करेल आणि लोकांना आश्चर्यचकित करेल. विरोधक स्वबळावर एकजूट करून भाजपचा पराभव करतील.

वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतातील विरोधक एकत्र आहेत, जमिनीवर खूप काही घडत आहे. सरकारविरोधातील हा छुपा अंडरकरंट आहे जो पुढच्या निवडणुकीत लोकांना चकित करेल. लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून काँग्रेसची इतर विरोधी पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे.