ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय – जयंत पाटील

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

ओबीसी समाजाला आरक्षण (OBC Reservation)मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब (Chhagan Bhujbal) पहिल्या दिवसापासून स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा करून अहवालही तयार केला आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल याबाबत पूर्ण विश्वास व्यक्त करतानाच ही लढाई अंतिम टप्प्यात असून निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये अशी विनंतीही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.