वीज कर्मचारी आणि बँकेचे कर्मचारी संपावर जाणार; जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वीज कर्मचारी पुढील आठवड्यात २८ आणि २९ मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संपावर जाणार आहेत. वीज कामगारांच्या कामगार संघटनेने बुधवारी ही माहिती दिली. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या (NCCOEEE) बुधवारी झालेल्या बैठकीत दोन दिवसीय देशव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला.

देशभरातील कामगार संघटनांच्या हाकेवरून सर्व राज्यातील वीज कर्मचारीही या दोन दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ सर्व राज्यांतील वीज कर्मचारीही संपात सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितले.

वीज (दुरुस्ती) विधेयक 2021 मागे घेण्यात यावे आणि सर्व प्रकारचे खाजगीकरण त्वरित थांबवावे, अशी मागणी वीज क्षेत्रातील कर्मचारी व अभियंत्यांची आहे. तसेच, विशेषत: चंदीगड, डागर नगर हवेली, दमण दीव आणि पुद्दुचेरीमध्ये वीज क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा.वीज मंडळांच्या विसर्जनानंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत सामावून घेण्यात यावे, अशीही वीज कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

बँक कर्मचारीही संपावर जाणार आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मंगळवारी सांगितले की, विविध कर्मचारी संघटनांनी 28-29 मार्च रोजी दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे बँक सेवांवर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण आणि बँक कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे.