सत्तेसाठी काहीही : आगामी निवडणुकांमध्ये MIM महाविकास आघाडीसोबत भाजपविरोधात लढणार ?

औरंगाबाद – गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. भाजपाला दूर ठेवणं आणि देशातून भाजप नष्ट करणं, या समान उद्दिष्टासाठी हा प्रस्ताव असल्याचं खासदारांनी सांगितलं.