‘हर घर जल’अंतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis  – केंद्र सरकारने ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. गंगापुर तालुक्यात देखील ‘हर घर जल’ व्दारे 373 गावांमध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे. 1 हजार कोटी रुपयांची ही योजना मंजूर झाली असून आता प्रत्येक घराला केवळ 10 पैशात एक लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

गंगापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत 373 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रवीण दरेकर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, ‘हर घर जल’ योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी मिळणार आहे. आमदार प्रशात बंब यांच्या पाठपुराव्यामुळे गंगापूर उपसा सिंचन योजनादेखील लवकरच पुर्णत्वास येईल. या योजनेमुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सिंचन योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार आहे. शासनाने एका वर्षात विविध लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आपले शासन गतिमान आहे. एका वर्षात आठ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील साडे आठ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत देशात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातदेखील पंतप्रधान मोदी यांनी 25 लाख नागरिकांना घरे तर 72 लाख नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिल्या आहेत. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी मोफत लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात 1 कोटी 10 लाख लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळते आहे. उज्वला योजनेअंतर्गत 39 लाख महिलांना गॅसजोडणी मिळाली आहे. कौशल्य विकास योजनेअतंर्गत 10 लाख तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध झाला आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 41 लाख तरुणांना कर्जपुरवठा करण्यात आला असून त्यातील 50 टक्के महिला असल्याचा उल्लेखही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून 36 लाख मातांना लाभ देण्यात आला आहे. राज्यात 4 लाख कोटी रुपयांची विकासाची कामे सुरू आहेत. नमो सन्मान मध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आपले शासन शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी उभे राहीले आहे. शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत विमा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तासांची वीज मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाचीही योजना आहे. ५ लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळणार असून यामुळे गरिबांना चांगले उपचार मिळणार असल्याचे  फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, राज्यातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व आजारावर मोफत उपचार मिळणार आहेत. नागरिकांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. इतर मागास वर्गीय घटकासाठी देखील मोदी आवास योजनेअंतर्गत १० लाख घरे मोफत देण्याची योजना आहे. पश्चिमी वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आले पाहिजे ही जुनी मागणी होती. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार आणि मराठवाडा पाणीदार करणार आहे. देशातील गरिबी कमी झालेली असून अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. २२ लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात आले असून १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर तालुक्याला पाणी मिळणार आहे. प्रत्येक नागरिकाला रोज ५५ लिटर पाणी देण्यासाठी ‘हर घर जल’ ही योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोना काळात गरीब लोकांना १० किलो अन्नधान्य दिले असून आताही ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आणि जनतेचे कल्याण केले आहे. आपला जगात बहुमान होत आहे. आपला देश आता सुरक्षित आहे. जगात आपल्याकडे विश्व गुरू म्हणून पहिल्या जाते. जनतेची सेवा, गरीबांचे कल्याण हेच सरकारचे ध्येय असून सर्वाचा विकास करणे हेच ब्रीदवाक्य आहे. अंत्योदय अंतर्गत अनेकांना अन्नधान्य मिळत आहे. उज्ज्वला गॅस, अवास योजना, जन धन योजने अंतर्गत गरिबांचे बँकेत खाते उघडण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

आमदार प्रशांत बंब यांनी प्रास्ताविक केले. २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘जल आराखडा’ तयार केला आहे. सर्वांना हक्काचे पाणी मिळत आहे. वॉटर ग्रीड अंतर्गत ६० लाख ६२ हजार नळजोडणी तालुक्यात होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक, लाभार्थी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.