लाऊडस्पीकरबाबत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन प्रत्येकाला करावेच लागेल ; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

बंगरूळ – महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही लाऊडस्पीकरचा वाद (Loudspeaker argument) पोहोचला आहे. श्री राम सेनेच्या घोषणेनंतर सोमवारी पहाटे ५ वाजल्यापासून कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण (Hanuman Chalisa recitation) केले . श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुबळी आणि म्हैसूरच्या हनुमान मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरवर भजन गायले आणि हनुमान चालिसाचेही पठण करण्यात आले.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी संपूर्ण राज्यात लाऊडस्पीकरबाबत कडक शब्दात भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येईल. बसवराज बोम्मई म्हणाले की, इतर राज्यात काय चालले आहे ते आम्ही पाहत आहोत. त्यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरबाबत बैठक झाली असून त्यात लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेणार असून, या बैठकीत ध्वनिक्षेपक कधी आणि कसा वापरायचा यावर चर्चा होणार आहे.

कर्नाटकातील लाऊडस्पीकरबाबत श्री राम सेनेच्या (Shri Ram Sena) या घोषणेमुळे संपूर्ण राज्यातील पोलीस हाय अलर्टवर आहेत. कोणताही वाद वाढू नये किंवा कोणतीही हिंसक घटना घडू नये यासाठी कर्नाटक सरकारने मंदिरांभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. श्री राम सेनेच्या घोषणेनंतर राज्याचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र (Home Minister Arga Gyanendra) म्हणाले, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर पावले उचलली जातील.