सामूहिक अत्याचार केल्याची तरुणीची खोटी तक्रार; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

नागपूर : गाण्याच्या क्लासला जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे दिवसाढवळय़ा रामदासपेठेतून अपहरण झाले, तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली आणि पोलीस विभागाची झोप उडाली. व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा गरम झाली. सीताबर्डी, कळमना पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले. स्वत: पोलिस आयुक्तही रस्त्यावर उतरले. परंतु काही तासांतच तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले.

सामूहिक अत्याचाराची तक्रार करणारी ही १९ वर्षीय बीए करते आहे. ती फेटरी मार्गावर राहत असून, रामदासपेठेत संगीताचे शिक्षण घेते. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ती बसमधून उतरली. चालत क्लासच्या दिशेने निघाली. दगडी पार्क जवळून जात असताना व्हॅनमध्ये बसलेल्या आरोपींनी तिला कारमध्ये कोंबले. त्यांनी तिला कळमन्यात आणले. येथील चिखली ते डिप्टी सिग्नल भागातील एका निर्जन ठिकाणी आणून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला व आरोपी पसार झाले. स्वत:ला सावरत तरुणीने टाईल्सच्या दुकानचालकाला मदत मागितली आणि आईला आणि एका मित्राला सदर ठिकाणी बोलावून घेतले. असा घटनाक्रम या तरुणीने कळमना पोलिसांना सांगितला.

वरिष्ठ पोलिसांना माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सीताबर्डी ठाण्यात पोहोचले. त्यानंतर तरुणीला वैद्यकीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. पीडितेसोबत झालेले घटनास्थळ आणि आरोपी यांच्यासंदर्भात उशिरा रात्रीपर्यंत कुठलीही स्पष्टता झाली नव्हती.

दिवसभर आरोपींच्या शोधात तब्बल एक हजार पोलीस सक्रिय होते. त्यांनी अपहरण करण्यात आलेल्या दगडी पार्क जवळून माहिती गोळा केली. घटनेनंतर अपहरण ठिकाणातील सीताबर्डी, झांशी राणी चौक, पंचशील चौक, दगडी पार्क, रामदासपेठेतील ७0 खासगी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या तपासात तरुणी सीताबर्डी परिसरात विविध ठिकाणी फिरली. ती आनंद टॉकीजजवळून ऑटोने मेयो चौकात पोहोचली. येथून दुसरा ऑटो घेत कळमन्यात आली. त्यानंतर दुपारी जवळपास १२ वाजताच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरिता पोहोचली.

संपूर्ण घटनेचा दगडी पार्कशी काहीही संबंध नव्हता, असे स्पष्ट झाले. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करणाऱ्या  डॉक्टरांनी सामूहिक बलात्काराबाबत शंका व्यक्त केल्यानंतर पोलिसांच्या विचारणीत तिने असे काहीही घडल्याचे नाकारले. व्यक्तिगत कारणावरून ही तक्रार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आरोपींच्या तपासाकरिता १0 उपायुक्तांसह १ हजार पोलिस या तपासात गुंतले होते.