आदित्य ठाकरेंवर तीन दिवसात गुन्हा दाखल करा; राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस

मुंबई  :  शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी नोटीसच राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या (National Commission for Child Rights) वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेनं केली होती.

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी  मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरे बचाव आंदोलनात (aarey forest protest) लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे.  3 दिवसांत एफआयआरसह अहवाल देण्याचा राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहे. राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सह्याद्री राईट्स फोरमनं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ईमेल पाठवत कारवाई करण्याची  मागणी केली होती. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचं ट्विट मेलमध्ये टाकले होते. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी असल्याचे दिसत आहे.