खंदरमाळी घटनेस जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विखे-पाटील

मृतांच्या कुटूंबास प्रत्येकी ११ लाखांची मदत

शिर्डी – संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे विजेचा शॉक लागून ४ लहान मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले. मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत आणि या भागातील आदिवासी कुटुबीयांच्या घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे वीजेचा शॉक लागून चि.अनिकेत अरुण बर्डे, चि.ओंकार अरूण बर्डे, चि.दर्शन अजित बर्डे व चि.विराज अजित बर्डे या चार भावंडांचा ८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या कुटूंबाची राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज खंदरमाळवाडी येथे सात्वंनपर भेट घेतली. आपल्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अशा शब्दांत मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी दिलासा दिला. काल रात्री मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतरही अंत्यविधी न करण्याचा निर्णय कूटूंब आणि ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या चारही मुलांवर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महसूलमंत्री विखे पाटील यांनी येठेवाडी येथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी एकत्रितपणे चर्चा करुन गावातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. अधिकाऱ्यांना या प्रश्नांबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच कालची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि स्व.गोपिनाथ मुंढे अपघात विमा योजनेतून प्रत्येक कुटूंबियांना ११ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

वादळीवाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा तातडीने पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने (Electricity Distribution Company) विशेष मोहिम जिल्ह्यांमध्ये हाती घेण्याबाबतही महसूलमंत्र्यानी अधिकाऱ्यांना सूचित केले.