सीता आणि रामाची पहिली भेट कशी झाली? पहिल्या भेटीत काय घडलं? 

दीपक पाठक : सीतेच्या स्वयंवराला उपस्थित राहण्यासाठी गुरुंसह राम-लक्ष्मण मिथिलेत पोहचले होते. प्रातःकाली पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरूंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी जनकाच्या बागेत पोहचले. त्याठिकाणी मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगीबेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते. पक्ष्यांच्या किलबिलाट सुरु होता. सुंदर फुलांमुळे बाग अतिशय मनमोहक दिसत होती. बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघे आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती. कारण (जगाला सुख देणाऱ्या) श्रीरामचंद्रांनाही तिने सुख दिले.

त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तेथे आली. तिच्या सोबत सुंदर व चतुर सख्या होत्या.सख्यांसह सरोवरात स्नान करून सीता प्रसन्नतेने गिरिजा मंदिरात गेली. तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा, म्हणून प्रार्थना केली.

एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम विळ होऊन ती सीतेजवळ आली. त्यावेळी तिने सीतेला आणि इतर सख्यांना राम आणि लक्ष्मण यांना पाहून तिच्या मनात आलेले विचार सांगितले. अत्यंत प्रेमपूर्वक केलेले ते वर्णन ऐकून सीतेच्या मनातही त्या दोघांना पाहण्याची  इच्छा झाली. तेव्हा एक सखी म्हणाली, ‘हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्याबरोबर आले आहेत, असे ऐकले होते, तेच हे राजकुमार असावेत.  सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले. त्या प्रिय सखीला पुढे करून सीता मंदिराच्या बाहेर आली.

मनात कधी एकदा त्या राजकुमाराला पाहतेय असे विचार सुरु असलेली सीता त्यावेळी जणू बावरलेल्या हरिणीप्रमाणे इकडे-तिकडे पाहात असावी अशी दिसत होती. सख्यांसह चालणाऱ्या सीतेचा मुख चंद्र पाहिला तेव्हा सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. परंतु मुखातून शब्द फुटला नाही.

सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. आजवर सौंदर्य-भवनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरूपी दीपशिखेमुळे उजळून निघाले, पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. कवींनी सर्व उपमा उष्ट्या करून टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ? असा प्रश्न त्यांना पडला. सीतेला पाहून आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले, ‘हे बंधू जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे, तीच ही जनककन्या आहे. सख्या हिला गौरी पूजनासाठी घेऊन आल्या आहेत असं दिसत आहे. राम लक्ष्मणाला बोलत होते मात्र ते सीतेच्या मुखरूपी कमलाचा सौंदर्यरूप मकरंद रस भ्रमराप्रमाणे प्राशन करीत होते.

दुसरीकडे  सीतेची देखील अवस्था काही वेगळी नव्हती. आपला हरवलेला खजिनाच सापडला असं तिला वाटले. श्रीरामांचे रूप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले. पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोष होऊन चकोरी पाहात होती.  नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्यांची दारे बंद करून घेतली. सख्यांनी जेव्हा बघितले की, सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या.

त्याचवेळी दोघे भाऊ लतामंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मल चंद्र ढगांचा पडदा सारून बाहेर आले होते. दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. सीतेचे देहभान हरपत चालल्याचे पाहून एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरून म्हणाली, ‘गिरिजादेवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस ?’ असा टोमणा मारला तेव्हा सीता लाजली. सख्यांनी जेव्हा पाहिले की, सीता प्रेमात आकंठ बुडाली आहे, तेव्हा त्या बावरून म्हणू लागल्या, ‘फार उशीर झाला आता निघाले पाहिजे.

सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे, असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठ्या धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि (त्यांचे ध्यान करीत) आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाइलाजाने परत निघाली. प्रभू श्रीरामांनी जेव्हा सुख, स्नेह, शोभा व गुणांची खाण असलेल्या सीतेला जाताना पाहिले. तेव्हा त्यांनी परम प्रेमाच्या कोमल शाईने तिचे स्वरूप आपल्या सुंदर चित्ताच्या पटलावर अंकित केले. संदर्भ :  रामचरितमानस