माहिती व जनसंपर्क विभागातील पदभरती अर्जातील त्रुटी दूर करून मुदतवाढ द्या – मेश्राम   

नागपूर –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व व जनसंपर्क विभागातील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या पदभरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी २३ जानेवारी ही अंतिम तारीख होती. मात्र अर्ज प्रक्रियेमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यापासून वंचित रहावे लागले. आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना पदभरतीला मुकावे लागण्याची वेळ ओढावली असून यासंदर्भात तातडीने लक्ष देउन सदर पदभरतीतील तांत्रिक त्रुटी दूर करून मुदतवाढ द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना निवेदनाद्वारे केली आहे.

माहिती व जनसंपर्क विभागातील पदभरती संदर्भात उमेदवारांकडून येणा-या तक्रारी लक्षात घेता भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयोगाच्या सचिवांना ई-मेलद्वारे निवेदन सादर केले.

निवेदनात ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये मागील दशकभरानंतर मोठी पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काढण्यात आली आहे. ही पदभरती मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेचे शिक्षण घेउन कार्य करणा-या पत्रकारांसाठी मोठी संधी आहे. मात्र आयोगाच्या जाहिरामध्ये स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतानाही उमेदवार जेव्हा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे संबंधित पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्याने अर्ज करण्यास पात्र नाहीत’, असा संदेश पुढे येतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही त्रुटी दूर करण्यासाठी कुठलीही कार्यवाही मात्र करण्यात आली नाही.

पत्रकारितेतील पदविका असलेल्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारण्यात येत आहेत. मात्र याउपर पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी असलेल्यांना या पदांसाठी अपात्र ठरविण्यात येत असून अर्ज स्वीकारले जात नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये नमूद अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता असूनही केवळ आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे अनेक विद्यार्थी या पदभरतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सदर विषयात जातीने लक्ष घालून संपूर्ण पदभरती पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी आयोगाने त्रुटी दूर करून जाहिरातीला मुदतवाढ देण्याची मागणीही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.