एकनाथ शिंदे यांना वाढता पाठींबा; प. महाराष्ट्रातील बड्या नेत्याने थेट गुवाहाटी गाठली 

गुवाहाटी : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला.सोबतच खासदार संजय राऊत यांची लुडबुड  या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेचे चाळीस ते बेचाळीस आमदार आमच्याकडे असल्याचा दावा हा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. यातच आता शिवसेनेचे बंडखोर नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

राजेश क्षीरसागर हे कोल्हापुरातील नेते असून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतही ते दोन दिवस नॉटरिचेबल होते. काही दिवसांपूर्वीच पुन्हा ते नॉटरिचेबल झाले, ते आज थेट गुवाहाटीतच दिसले. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या मुंबईतल्या बैठकांना उपस्थित असणारे नेतेही काही काळातच गुवाहाटीत दिसून आले आहेत. त्यामुळे ही गळती रोखण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे.